राज्यात सोमवारपासून पावसाला होणार सुरूवात : हवामान खात्याचा अंदाज
पुणे : र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे हालचाल मंद गतीने सुरू असले, मोसमी वारे पुढच्या दोन ते तीन दिवसात दिवसांत केरळ प्रांतात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभाग यांच्याकडून पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
मोसमी वारे दाखल होण्याच्या या कालावधीत सोमवारपासून राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वाऱ्यांच्या हालचालींना वेग आले आहे. दक्षिण अरबी समुद्राचे बरेचसे क्षेत्र मोसमी वाऱ्यांनी व्यापले असून, पार लक्षद्वीपपर्यंत प्रवास केला आहे.श्रीलंकेचा जवळपास अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहे. मात्र शनिवारपासून मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास थांबला आहे. आता मात्र या वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील काही तासांमध्ये आणखी प्रगती करतील आणि दोन-तीन दिवसांत केरळच्या मार्गाने भारतात प्रवेश करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण अरबी समुद्रातून दाखल होणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आता केरळसह दक्षिणेकडील राज्यांतील काही भागांमध्ये आणि भारतीय किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही सध्या पावसाळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील बराचश्या भागात सध्या दुपारनंतर अंशत: काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दुपारी तापमानाचा पारा जास्त दिसून येत असून, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान ३० मेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या मुख्यत्वे दक्षिण भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही, हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.