जिल्ह्यातील 12 गावे आणि वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

गोंदिया: गाव, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच धर्तीवर समाज कल्याण विभागाने याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्यातील 12 गावे आणि 58 वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली आहे. त्यामुळे पोवारीटोला वस्ती आता शिवाजीनगर म्हणून ओळखली जाणार आहे.

राज्यातील अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना आणि वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब भूषणवह नाही. त्यामुळे ही नावे बदलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यासंदर्भात विशेष सामाजिक न्याय व साहाय्यक विभागातर्फे 11 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय जारी केला होता. यानंतर गोंदिया जिल्ह्यात याची पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील 11 आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 1 गावाचे तर उर्वरित सहा तालुक्यातील 58 वस्त्यांची नावे जातिवाचक होती.

जिल्ह्यातील 12 गावे आणि वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यात आली आहे. या गावे आणि वस्त्यांना दत्तात्रयनगर, जंबुदीपनगर, संत रविदास, आदर्शनगर, बुद्धनगर, जोतिबानगर, एकलव्यनगर अशी नावे देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागांतर्गत उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली. वस्त्या आणि गावांची जातिवाचक नावे बदलण्याच्या अंमलबजावणी निर्णयाची करण्यात गोंदिया जिल्हा अग्रेसर राहिला आहे.

महापुरुषांची दिली नावे 

राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जातिवाचक गावांची नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नावे देण्यात येणार होती. जोतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी राहू महाराज, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यायची होती. याचीच अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली.

Share