नक्षल सदस्याला बॅनर लावतांना रंगेहात पकडले
गडचिरोली 20: उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील मौजा कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्यांच्या जनमिलीशीया सदस्याला गडचिरोली पोलीस जवानांनी नक्षल बॅनर लावतांना रंगेहात पकडण्यात यश प्राप्त केले आहे. सदर जनमिलीशीया हा पोमके कोठी हद्दीतील मौजा तुमरकोडी या गावातील रहीवासी असुन त्याचे नाव लालसु चैतु मट्टामी असे आहे.
दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी नक्षलवाद्यांचा विलय दिन असुन त्या पार्श्वभुमीवर नक्षलवादी जिल्हयातील विविध भागात हिंसक कारवाया करीत आहेत. अतिदुर्गम गावामध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलीशीया कार्यरत असुन अटक करण्यात आलेला लालसु चैतु मट्टामी हा जनमिलीशीया सदस्य आहे. गडचिरोली पोलीस दला कडुन त्याला नक्षलवाद्यांना मदत न करण्याबाबत वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या तरीही तो पोलीसांचे सांगणे ऐकुन न घेता नक्षलवाद्यांना मदत करीत होता. आज दिनांक 20/09/2021 रोजी कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्याच्या विलय दिनाच्या निमीत्याने सामान्य जनतेमध्ये दहशत परविण्यासाठी नक्षल बॅनर लावत असतांना आढळुन आला. त्याचे कडुन नक्षल बॅनर व इतर नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले असुन गडचिरोली पोलीस दला कडुन त्याच्यावर अटकेची कार्यवाही सुरु आहे.
नक्षलवाद्यांच्या 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. मनीष कलवानिया सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख, पोलीस उपअधिक्षक श्री. भाऊसाहेब ढोले (अभियान), सी-60 चे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. अभिजीत पाटील यांचे नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात नक्षविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन सदरच्या कारवाई करीता भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवने व पोमके कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. महेश घुगे यांनी अथक परीश्रम घेतले आहे. जनमिलीशीया सदस्याला रंगेहात पकडणाऱ्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले आहे. या वेळी मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी नक्षलवाद्यांच्या विलय दिन सप्ताहाला कोणतेही सहकार्य न करता जोरदार निषेध करावा असे जनतेला आवाहन केले आहे.