भामरागड : मडवेली जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक
अहेरी : उपविभाग भामरागड अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात काल १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुुमारास पोलीन-नक्षल चकमक उडाल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. सदर कारवाई दरम्यान नक्षल्यांचा मोठा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश आले आहे.
काल १९ सप्टेंबर रोजी मडवेली जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी १२ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलीसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलादा फायदा घेत पळ काढला.
२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमिवर नक्षल्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठया घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. दरम्यान चकमकीनंतर पोलीस जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम राबविली असता ३० ते ४० नक्षली शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, मोठया प्रमाणावर पिट्टू, नक्षल साहित्य, कुकर बॉम्ब मिळून आले. आयईडी व कुकर बॉम्ब हे घटनास्थळीच सतर्कतेने नष्ट करण्यात आले. जवानांनी सदर कारवाई दरम्यान नक्षल्यांचा मोठा शिबीर उधळून लावण्यात मोठे यश आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सी-६० प्रभारी अभिजीत पाटील यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विशेष अभियान पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे निर्देश दिले.