मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबास 10 लाखांचे अर्थसहाय्य
गोंदिया 18 : ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदानाकरिता कर्तव्य बजावत असताना अचानक पोलीस कर्मचार्याची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
सविस्तर असे की, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होते. यात दवनीवाडा पोलीस ठाण्यातील नायब पोलीस शिपाई रुपचंद झनकलाल ढोमणे हे गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा धापेवाडा येथे निवडणूक कर्तव्य बजावत होते. दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
स्व.रुपचंद ढोमणे यांच्या वारसांना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. सदर सानुग्रह अनुदानाचे 10 लाख रुपयांचे धनादेश मृतक कर्मचारी यांची पत्नी उर्मिला रुपचंद ढोमणे यांना अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले व प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) लीना फलके यांच्या उपस्थितीत देण्यात आले. अर्थसहाय्य मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.