एसटी महामंडळाला 500 कोटी तातडीने वितरित
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर कार्यवाही
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्यास होणार मदत
मुंबई, दि.२ : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाला आधीच वितरित केला आहे. उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.