रेल्वेच्या धडकेत महिला ठार : माहिती देणार्‍यास पोलीस विभागाकडून मिळणार बक्षीस

अर्जुनी-मोरगाव 25 : वडेगाव रेल्वे ते वडसा दरम्यान असलेल्या आसोली जंगल शिवारातील रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी महिलेला रेल्वेची धडक लागल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. त्याच अवस्थेत जखमी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तिचा मृत्यू झाला. हा घटना सोमवार, 24 मे रोजी सकाळी 5.30 वाजता निदर्शनास आली.

अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी अकस्मात मृत्यु क्र. 16/2021 कलम 174 सिआरपीसीप्रमाणे मर्ग दाखल आहे. सदर अनोळखी मयत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मृतदेहाच्या वर्णनावरून तिची ओळख व माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी केले आहे. 


सदर अनोळखी स्त्रिचे वय अंदाजे 60 ते 65 वर्ष असून उंची अंदाजे पाच फुट चार इंच, रंग सावळा, केस पांढरे, दोन्ही हाताचे व पायाचे नखे वाढलेले आहेत. सदर मयत महिलेच्या अंगावर पोपटी रंगाची साडी, लाल रंगाचे ब्लाउज, डाव्या हातामध्ये पिवळसर रंगाचे प्लास्टिकचे तीन बाजारू कंगन, दोन्ही हाताचे मनगट यामध्ये हिरवा धागा, गळ्यात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या दोन माळ, गळ्यात पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या फुलांची हार तसेच झेंडूच्या वाढलेल्या फुलाचे हार आहे. 

प्रथम दर्शनी पाहता सदर मयत स्त्री ही वेडसर असल्याचे दिसून येते. या वर्णनाच्या महिलेची ओळख, माहिती आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला पोलीस विभागाकडून बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी सांगितले आहे.

Share