
गोंदिया : लक्ष्मीमुक्ती योजनेतंर्गत सातबारावर शेतकऱ्याच्या पत्नीचेही नाव लावण्यात येणार आहे. यातंर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे परिपत्रक अन्वये लक्ष्मीमुक्ती योजना सुरु केली आहे. सदर योजनेतंर्गत एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशिर पत्नींच्या नावाचा सातबारा च्या उमाऱ्यावर स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्याकरिता स्वेच्छेने विनंती केल्यास त्याच्या कायदेशिर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शासन निर्णय दिनांक १ ऑगस्ट २०२५ अन्वये शासकीय जमिनीवरील दिनांक १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ केले अतिक्रमणे नियमित करणे तसेच शासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या वापरात नसलेले पांदण रस्ते अथवा गावातंर्गत रस्ते तसेच रस्त्यांच्यासिमेमधील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क निरसित करून घरकुलासाठी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने कार्यपध्दती निश्चीत करून दिली आहे. त्यानुसार दिनांक १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ ज्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे अशा व्यक्तींनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे विहीत नमून्यात अर्ज दिनांक १ सप्टेंबर २०११ पूर्वीचे अतिक्रमणाचे पुरावे व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून तिक्रमणे नियमानुकुल करून घ्यावे.








