‘एक पेड मां के नाम’ उपक्रमात २ लाख विद्यार्थी सहभागी होणार

गोंदिया : इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘एक पेड मां के नाम’ या शिर्षांतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहिम राबविणेबाबत भारत सरकारचे निर्देश आहेत. यातंर्गत जिल्ह्यातील १६४० शाळांतील २ लाख विद्यार्थी वृक्ष लागवड करणार आहेत.

निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी शासनाच्या वतीने ‘एक पेड मां के नाम’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन एक तरी झाड लावणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक शाळेला किमान ७० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही मोहिम वनविभगाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपनासाठी शाळांना वनविभागाकडून रोपे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरणविषयक उपक्रम शाळा स्तरावर व परिसरामध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करताना आई-वडील, भाऊ-बहिण किंवा काका-काकू यांच्यासोबत वृक्ष लागवड करून तसा फोटो काढून यु-डायस नंबर व फोटो अपलोड करायची आहे.

या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, अनुदानीत, खासगी स्वयंअर्थसहाय्य अशा सर्व व्यवस्थापनातील १६४० शाळांचा सहभाग असून २ लाख विद्यार्थी वृक्ष लागवड करणार आहेत. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असताना मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी शाळांकडे रोपट्यांची कमतरता भासू नये यासाठी शासनाकडून सामाजिक वनीकरण विभागाला शाळांना रोपटे पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १४० शाळांतील ४६६ विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे. या मोहिमेतंर्गत गेल्या २० दिवसात जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वृक्षारोपन केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘एक झाड मां के नाम’ मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शाळा प्रशासन, विद्यार्थी व त्यांचे पालक, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात मोहिमेतंर्गत वृक्ष लागवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी अल्प असल्याने केवळ शाळांमध्येच नाही तर विद्यार्थ्यांनी घराच्या आंगण परीसरात किंवा शेतात आई किंवा वडील अथवा काका, भाऊ यांच्यासह वृक्ष लागवड करून फोटो अपलोड करण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें