जिल्हात सुरू होणार अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, शालेय क्रीडा स्पर्धाना हिरवी झेंडी

गोंदिया◼️विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी पूर्वी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. काही वर्षापुर्वी हा मंडळच बर्खास्त करण्यात आला. तेव्हापासून शालेय क्रीडा स्पर्धांना ब्रेक होता. आता पुन्हा या स्पर्धांचे आयोजन भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहेत. शुक्रवार 30 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत या संबंधिचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 30 लाखांचा निधीला समितीने मंजूरी दिली आहे.

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक व पूर्व माध्यमिकच्या 1017 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये 86 हजार 836 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय व इतर गरीब पालकांच्या मुलेमुली अधिक प्रमाणात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शारिरीक विकासासाठी केंद्र, पंचायत समिती व जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे अपेक्षित होते. याकरीता जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक तथा पालकांकडून क्रीडा व सांस्कृतिक स्पार्धांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली होती. पुर्वी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी आणि लोकवर्गणी संकलीत करून उपलब्ध निधीद्वारे केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते.

विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा तसेच बौद्धिक व शारिरीक विकास होण्याच्या दृष्टीने तथा शालेय School sports competition खेळाडूंना क्रीडा प्रकारात नैपुण्यपुर्ण कामगिरी करता यावी यासाठी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. याअंतर्गत कबड्डी, खो-खो आदी मैदानी खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. सहा वर्षापुर्वी हा मंडळ बरखास्त करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना बे्रक लागला होता. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन करण्याकरीता जिपचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यशवंत गणवीर, बांधकाम सभापती संजय टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सोनू कुथे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाज कल्याण सभापती पूजा सेठ यांच्यासह स्थायी समिती सदस्य लायकराम भेंडारकर, रजनी कुंभरे, चत्रभुज बिसेन, डॉ. लक्ष्मण भगत, सुरेश हर्षे, संदीप भाटीया, जितेंद्र कटरे आदिंनी सभेत ठराव मंजुरीकरीता सहमती दर्शविली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी ठरावास मंजुरी दिली. आता या स्पर्धा भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव (अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव) या नावाने आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी जिल्हा निधीतून 30 लाखांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. याबाबत योग्य नियम, अटी व शर्ती तयार करण्याचे निर्देश प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक संघटना, पालक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share