तीन ट्रॅक्टरसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदियाः जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने 28 डिसेंबर रोजी आमगाव पोलिस हद्दीतील बाघनदीच्या मारबद घाटाच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 15 लाख 4 हजार रुपयाचा मुद्देमाल करण्यात आला.

तालुक्यातून वाहणार्‍या वाघनदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वाळू तस्करांवर आळा घालण्याकरिता विशेष मोहिम हाती घेतली आहे. यातंर्गत 28 डिसेंबर रोजी मारबद घाट परिसरात छापामार कारवाई करीत विशेष पोलिस पथकाने एमएच 35,जी 6888, ट्रॉली क्र. एमएच 35,आर 3867, एमएच 35,जी 7744, ट्रॉली क्र. एमएच 35, जी 5180 आणि एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विनेश ब्रम्हईया (26) रा. गणेशपूर, सतीश बागडे (35) रा. पद्मपूर, शुभम बागडे (25) रा. पद्मपूर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कलम 379, 34 भादंवि अन्वये आमगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस पथकातील पोलिस अंमलदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोना शैलेषकुमार निनावे, पोशि सन्नी चौरसिया, दया घरत, हरिकृष्णा राव यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share