हत्तीच्या कळपामुळे दीडशे शेतकरी पीडित

गोंदिया: गडचिरोली जिल्ह्यातून पुन्हा हत्तीच्या कळपाने (Herd of Elephants) अर्जुनी मोर तालुक्यात प्रवेश केला आहे. या कळपाने दीडशे शेतकर्‍यांच्या कापणी केलेल्या व शेतात उभे असलेल्या धानपीकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक दहशतीखाली आहेत. सध्या हत्तीच्या कळप दिवसभर शेतशिवारात फिरत असून रात्रीला कान्होली-जब्बारखेडा जंगलात बस्तान मांडत आहे. दरम्यान वनविभाग हत्तीच्या कळपावर सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून आहे.

मागील महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाने (Herd of Elephants) अर्जुनी मोर तालुक्यात प्रवेश केला होता. या कळपाने अनेक शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या धानपीकाचे नुकसान केले. तसेच काही गावात प्रवेश करुन नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. तसेच हत्तीच्या हल्ल्यात एका नागरिकांचा मृत्यूही झाला होता. हत्तीच्या शेतातील व गावातील हैदोसामुळे नागरिक दहशतीखाली होती.

दरम्यान वनविभागाच्या प्रयत्नानंतर हत्तीचा कळपाने गडचिरोली जिल्ह्यात पलायन केले होते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र मागील पाच दिवसापूर्वी हत्तीचा कळप पुन्हा अर्जुनी मोर तालुक्यात दाखल झाला आहे. दिवसभर शेतशिवारात हैदोस घातल्यावर हत्तीचा कळप रात्रीला नवेगावबांध क्षेत्रातील कान्होली-जब्बारखेडा जंगलात आश्रयाला येतो. हत्तीच्या कळपामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कापणी केलेले धानपीक घरात आणून ठेवत असले तरी अद्याप कापणी न झालेल्या धानासाठी शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान वनविभाग हत्तीच्या कळपावर सीसीटीव्ही कॅमेरांसह ड्रोपच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहे. मात्र हत्तीचा कळप क्षेत्रातून बाहेर जाईपर्यंत शेतकरी व नागरिकांची धाकधुक कायम राहणार आहे. 

45 लाखांची नुकसान भरपाई वाटप

हत्तीचा कळप (Herd of Elephants पुन्हा जिल्ह्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईचा अर्ज दिला आहे. यातील 140 शेतकर्‍यांचे अर्ज मंजूर झाले असून 45 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तरी शेतकरी व नागरिकांनी हत्तीच्या कळपापासून सावध राहावे, असे आवाहन नवेगावबांधचे सहायक वन संरक्षक दादा राऊत यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share