जिल्ह्यात स्थलांतरीत बालकांची 20 पासून शोधमोहिम

गोंदिया: सर्व शिक्षा अभियानातंर्गत स्थलांतरीत बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोहिम जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याकरिता नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून या मोहिमेत 3 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांचा शोध घेण्यात येणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 4 नुसार स्थलांतरीत बालकांचा शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अशा बालकांच्या बाबतीत करावयाच्या उपाययोजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. यासाठी विविध कारणांमुळे स्थलांतरीत होणार्‍या कामगारांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तर 5 डिसेंबर रोजी मोहिमेची एकंदरीत माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे. सर्वक्षणाचा कालावधी, मार्गदर्शक सूचना व सामान्य प्रतिबंधक उपाय, सर्वेक्षणाची अंमलबजावणी, कामाचे वेळापत्रक, कार्यवाही करण्याची जबाबदारी, विविध नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबतचे नियोजन आखून देण्यात आले आहे. त्याकरिता नोडल अधिकारी, प्रगणक यांची जबाबदारी देखील संबंधितांवर देण्यात आली आहे. एकही शाळाबाह्य बालक आढळून न आल्यास तसे हमीपत्र भरुन द्यावे लागणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share