1419 वाहनचालकांकडून 84 लाखांचा दंड वसूल

गोंदिया : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 1419 वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करून 84 लाख 10 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच वर्षभर विविध मोहीम राबवून वाहनचालकांना शिस्त लावण्याचे काम केले जाते.
गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाने चालू आर्थिक वर्षातील सहा महिन्यात शासनाच्या तिजोरीत 24 कोटी 69 लाख रूपयांचा महसूल जमा केला आहे. वाहन कर, पर्यावरण कर, आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क, दंडवसुली व कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध वाहन लायसन्स संबंधित शुल्काचा यात समावेश आहे. मागील सहा महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 4871 दुचाकी वाहने, 6530 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. तर 5224 शिकाऊ लायसन्स व 7797 स्थायी लायसन्स वितरित करण्यात आले. तसेच कार्यालयाच्या वायुवेग पथकाच्या माध्यमातून 1419 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यातून 84 लाख 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गोंदिया सारख्या अविकसीत जिल्ह्यात व अपुऱ्या मनुष्य बळावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवित शासनाच्या तिजोरीत 24 कोटी 69 रूपयांचा महसूल जमा केला आहे.

वाहनचालकांना शिस्त लावून वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातांना आळा बसावा यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविली जात आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यास सहकार्य करावे.

Print Friendly, PDF & Email
Share