गोंदिया जिल्हात आरोग्य सेवेला रिक्त पदाचे ग्रहण

गोंदिया: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र जिपच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांसह इतर आरोग्य कर्मचारी, तंत्रज्ञ, शिपाई आदी विविध पदे रिक्त असल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे उत्कृष्ट आरोग्य सेवेची अपेक्षा कशी करावी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत उपस्थित होत आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद वगळता विविध संवगार्तील तब्बल 351 पदे रिक्त आहेत. यामुळे कर्मचार्‍यांना जिल्ह्यात आरोग्य सेवा कशी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल, डोंगराळ, दुर्गम व नक्षल प्रभावित आहे. आजही जिल्ह्यातील अनेक वाड्यांमध्ये आरोग्य सुविधा पोहचली नाही, पक्के रस्ते, शैक्षणिक सुविध नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 44 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पैकी 19 प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी क्षेत्रात आहेत. 258 आरोग्य उपक्रंद्र आहेत. 10 ग्रमीण रुग्णालय आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला गत अनेक वर्षापासून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांसह विविध संवगार्तील तब्बल 351 पदे रिक्त असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांची 50 टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागात रिक्त पदांमुळे आरोग्य सेवचा बाजवारा उडाला असून गोरगरीब जनतेला शहरातील महागडे उपचार घेऊन मानसिक, शारिरीक, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद वगळता विविध संवर्गातील 785 पदे मंजुर आहेत. यापैकी 434 पदे भरली असून 351 पदे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षकांचे 17 पदे मंजुर असून 5 पदे रिक्त, औषध निर्माण अधिकारी 44 पदे मंजुर 11 पदे रिक्त, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी 17 पदे मंजुर असून 3 पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक 64 पैकी 4 पदे रिक्त, आरोग्य सेवकांच्या 196 पदांपैकी 84 पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यीका 40 पैकी 8 पदे रिक्त, आरोग्य सेविका 366 पदांपैकी 205 पदे रिक्त आहेत. सफाई कामगार 40 पदे मंजुर असून 26 रिक्त आहेत. तर कार्यरत पदांपैकी अनेक पदे सेवानिनिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत.

आस्थापनेतही 5 पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेतही विविध पदे रिक्त आहेत. यात सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, कनिष्ठ सहाय्यक 3 व आरोग्य सेवकाचे 1 पदे असे एकूण 5 पदे रिक्त आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share