टीईटी गैरप्रकारात गोंदिया जिल्हातील 9 उमेदवार , यादी जाहीर

गोंदिया 10: दोन वर्षापूर्वी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. या यादीत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या 73 परीक्षार्थींपैकी 9 परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. या परीक्षार्थ्यांना यापुढे होणार्‍या टीईटी परीक्षा देता येणार नसून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील तरतूदीनुसार सर्व प्राथमिक (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक विभाग व इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक विभाग अशा दोन स्तरावर घेण्यात येते. यातंर्गत 2019-20 या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या गैरप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. गैरप्रकार केलेल्या परीक्षार्थ्यांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार 7 हजार 874 परीक्षार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत टीईटी परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील 73 परीक्षार्थ्यांपैकी 9 परीक्षार्थ्यांच्या नावे समाविष्ट आहेत. यात प्राथमिक विभागात रागिणी ताराचंद फेंडारकर, नेहा घनश्याम सोनवाने, महेंद्र भरतलाल मेले, नम्रता देवराम मालाधारी, पुनम विलास ठाकरे, झेबा अंजुम मोहम्मद नईम शेख, सुरेंद्र संतोषदास नागपुरे, दुर्गेश शिवालय लिल्हारे यांचा समावेश आहे. या सर्व परीक्षार्थ्यांना बेकायदेशीर ठरवले आहे. या परीक्षार्थ्यांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच शिक्षक म्हणून नोकरी करणार्‍या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फची कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. यातंर्गत जिल्ह्यातील खासगी शाळेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांवर बडतर्फाची कारवाई होणार असल्याची माहिती जिपच्या उपशिक्षणाधिकार्‍यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share