स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ‘हर घर झेंडा’ अभियान

गोंदिया: भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून जिहाधिकारी नयना गुंडे यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गुंडे म्हणाल्या, 20 जूनच्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना जनमाणसात कायम राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वयंस्फूतीने लावायचा आहे. त्यासाठी ध्वजसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत झेंडे तयार करण्याचे नियोजन आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या इमारतीवर तसेच नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे शासन आदेशात नमूद आहे.

असा राहील राष्ट्रध्वज..

केंद्रीय गृह विभागाच्या 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share