ठाणेदाराच्या दडपशाही धोरणामुळे महिला पोलीस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न, ठाणेदाराची तडकाफडकी रवानगी

◼️सकाळी निवेदन देताच सायंकाळी कारवाई

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई नीतू चौधरी यांनी फिनाईल प्राशन करून २ जूनरोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाणेदाराच्या हिटलरशाही धोरणामुळे पोलीस कर्मचारी तणावात काम करीत आहेत. यातूनच नीतू चौधरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल, नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या यंत्रणेकडून करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी २ जूनरोजी आपल्या अधिनस्त कर्मचारी महिला पोलीस शिपाई नीतू चौधरी यांचा खूप अपमान केल्यामुळे त्यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या संस्थेकडून करून कार्यरत असलेले महेश बनसोडे यांना तत्काळ येथून हटवावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी महेश बनसोडे यांना हटवण्याची ग्वाही दिली. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अमर वऱ्हाडे, आ. सहेषराम कोरोटे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी. जि. प.अध्यक्ष उषा मेंढे, जि प सदस्य व माजी महिला अध्यक्ष उषा शहारे , माजी सभापती पी. जी. कटरे, इसुलाल भालेकर व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

◼️ठाणेदार बनसोडेची नियंत्रण कक्षात रवानगी

पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना ठाणेदारांकडून वारंवार त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्यामुळे एका महिला पोलीस कर्मचारी ने फिनाईल प्राशन करून दोन जून रोजी सकाळी ११ वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला हे प्रकरण चांगलेच गाजत असताना पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांची तडकाफडकी रवानगी पोलीस नियंत्रण कक्ष येथे केली आहे. तर त्यांच्या ठिकाणी ठाणेदार म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

◼️प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
२ जून रोजी गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई यांचा आत्महत्येचा प्रयत्न पोलीस विभागाने दडपण्याचा प्रयत्न केला. त्या पोलीस शिपायाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर दिवसभर कोणत्याही राजकीय प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेटण्यास मज्जाव केला. नीतू चौधरी यांच्या नातेवाईकांनासुद्धा रुग्णालयाच्या परिसरामध्ये राहू दिले नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण दपडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

Print Friendly, PDF & Email
Share