कोरोनामुळे संपली सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा

◼️गरिब वरवधुच्या पालकांना महागामुळे लग्न खर्चाचा बजेट बिघडला

◼️देवस्थाने, ट्रस्ट, लोकप्रतिनिधी, पुढारी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे

प्राचार्य डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स

देवरी 17: आदिवासी नक्षल मागासलेला भाग म्हणून देवरी तालुक्याची ओळख आहे. येथील बहुतांश भाग जंगलांनी व्यापलेला असून शेती आणि पशुपालन ha येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. उद्योगाच्या संधी आणि औद्योगिक क्रांती या तालुक्यात अजूनही बघावयास मिळत नाही. ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी फायदेशीर ठरलेली सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कोरोनाच्या संक्रमणामुळे संपुष्टात आली आहे. या वर्षी लग्नसराईच्या हंगामात कुठेही सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले नसल्याने गरीब कुटुंबांतील वरवधुंच्या लग्नाची मोठी पंचाईत झाली असल्याचे चित्र आहे.

कोरोना काळाच्यापूर्वी सामूहिक विवाहाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परंपरा सुरू होती. दरवर्षीच्या लग्नसराईच्या हंगामात गावोगावी सामुदायिक विवाह सोहळे व्हायचे या सोहळ्यांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळाला. शेकडो लग्न ही एकाच दिवशी सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडायची. यामध्ये वर-वधू कुटुंबीयांच्या खर्चात मोठी बचत व्हायची. मंडप, जेवणासाठीचा खर्च कमी यायचा. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळे समाजातून हद्दपार झाले आहे आहेत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील सुसज्ज सोयी – सुविधायुक्त मंगल कार्यालयत लग्नमालकांची पसंती मंगल कार्यालयांनाच दिसू लागल्यामुळे सामूहिक विवाह सोह्यांमध्ये लग्न करण्याचे वर-वधू कुटुंबीयांना व नातेवाईकांना कमीपणाचे वाटू लागले आहे. सामुदायिक विवाह सोहळा समिती हळूहळू लुप्त पावणार का असा सवाल उभा आहे.

सामूहिक विवाह सोहळा चळवळीची दखल राज्य शासनानेदेखील त्या काळी घेतली होती. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केलेल्या नवदाम्पत्याला दहा हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळत होते. योजनेचा लाभदेखील अनेक गरीब कुटुंबांना झाला होता. गेली दोन वर्षे लग्नसराईचा हंगाम कोरोनामुळे वाया गेला. आता शासनानेकोरोना विषाणूच्या संक्रमणावर सर्वच निर्बंध काढलेली आहेत. विवाह धूमधडाक्यात सुरू आहेत. परंतु, जिल्ह्यातील एकाही गावात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला नाही. बंद पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यांना चालना देण्यासाठी देवस्थाने, ट्रस्ट, लोकप्रतिनिधी, पुढारी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यापूर्वी जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करायचे. आता त्यांनी देखील विवाह सोहळ्यांच्या आयोजनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

Print Friendly, PDF & Email
Share