घन कचरा घोटाळा;एका आमदारासह ११ आरोपींचे बँक खाते सील

उमरखेड -नगरपालिकेतील घन कचरा 65 लाख 70 हजाराच्या घोटाळा प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी वळता केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी नगर पालिकेत पाहणी करीत संबंधीत प्रकरणातील दस्ताऐवज ताब्यात घेतले. त्यासोबतच सर्व 11 आरोपींचे बँक खाते सील केले आहे. आमदारांसह अकरा आरोपींचा शोध घेऊन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे करणार आहेत. या प्रकरणातील महत्त्वाचे दस्तावेज शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने जप्त केले आहेत. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यामुळे या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येणार असून यात अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड नगरपालिकेतील 65लाख 70 हजाराच्या घनकचरा घोटाळ्याची लेखी फिर्याद 7 फेब्रुवारीला उमरखेडचे मुख्याधिकारी चारूदत्त इंगोले यांनी दिली. त्यानंतर या प्रकरणात उमरखेडचे आमदार यांचेसह सुमारे अकरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. त्या दिवसापासून हे सर्व आरोपी फरार असून सर्वांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे तसेच या सर्व आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके निर्माण केली होती. त्यात पोलिस उपनिरीक्षक सुजाता बनसोड व गिरीश तोगरवाड या दोघांच्या नेतृत्वात वेगवेगळी दोन पथके 7 फेब्रुवारीपासून आमदारांसह अकरा आरोपींचा कसून तपास घेत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी उमरखेड पोलिसांकडून काढून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share