चार्जशीट दाखल न करण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक वनसंरक्षक व वनपालास अटक

नागपूर : वन कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) आणि दाेषाराेप पत्र दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत, त्यातील ५० हजार रुपयांची लाख स्वीकारणाऱ्या वनपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात सहायक वनसंरक्षकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी करण्यात हिवराबाजार येथे करण्यात आली.
सहायक वनसंरक्षक संदीप गिरी (५२) व वनपाल निशाद अली हसन अली बाबीनवाले (५३, रा.सालई, ता.रामटेक) अशी आराेपींची नावे आहेत. निशाद अली हसन अली बाबीनवाले याची वनविभागाच्या हिवराबाजार, ता.रामटेक येथील कार्यालयात नियुक्ती असून, संदीप गिरी यांची रामटेक कार्यालयात नियुक्ती आहे.तक्रारकर्त्यावर काही दिवसांपूर्वी वन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती. त्या प्रकरणात एफआयआर आणि दाेषाराेप पत्र दाखल केले जाऊ नये, यासाठी या दाेघांनी त्याला एक लाख रुपयांची मागणी केली हाेती. लाच द्यावयाची नसल्याने, त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात बुधवारी (दि.१२) तक्रार नाेंदविली हाेती. त्या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी हिवराबाजार येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. निशाद अली हसन अली बाबीनवाले याने पहिल्या हप्त्याचे ५० हजार रुपये स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात सहायक वनसंरक्षक संदीप गिरी यांचे नाव समाेर आल्याने त्यांच्यावरही गुन्हा नाेंदविण्यात आला. गुन्हा नाेंदविणे आणि अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, मधुकर गीते, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, हवालदार दिनेश शिवले, सारंग बालपांडे, सुशील यादव, मंगेश कळंबे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, सूरज भोंगाडे, अमोल भक्ते, विनोद नायगमवार यांच्या पथकाने केली.
तक्रारकर्ताही गुन्हेगार?
या प्रकरणातील तक्रारकर्त्याचे निशाद अली हसन अली बाबीनवाले व वनविभागाच्या अन्य अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध हाेते. ताे जंगलातील अवैध वृक्षताेड, झाडे व रेतीची चाेरी यांसह अन्य प्रकरणात लिप्त आहे. त्याने यापूर्वीही वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांवर एसीबीची कारवाई करवून घेतली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share