सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याच्या सौंदर्याचे प्रतिक : जिल्हाधिकारी गुंडे

◾️सारस जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी व ओमायक्रॉन बाबतीतही जागृती

गोंदिया 13 : शेतकरी मित्र व गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्षाचे संवर्धनाबाबत जनमानसात जाणिव जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली. सारस पक्षी जिल्ह्याच्या सौंदर्याचे प्रतिक असून सारस संवर्धनासाठी शेतकरी, नागरिक, पक्षी प्रेमी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

हा चित्ररथ सारस पक्षाचा अधिवास असलेल्या क्षेत्रात तसेच विविध भागात सारस विषयी जनजागृती करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते.

नवेगावबांध, नागझिरा, बोदलकसा, चोरखमारा, कचारगड, हाजराफॉल अशा अनेक सौंदर्य स्थळांनी गोंदिया जिल्हा नटलेला असून सारस पक्षी जिल्ह्याच्या सौंदर्याचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य भारतात गोंदिया, भंडारा व बालाघाट जिल्ह्यात छोटा तलाव (बोडी) व भाताच्या शेतात आढळतो. हा स्थानिक पक्षी असून एकदा जोडी तयार झाल्यावर कायमस्वरूपी टिकते. त्याचा अधिवास त्याने संरक्षीत केलेला असतो. त्याच्या तेवढ्या भागात दुसरे सारस पक्षी येत नाहीत. गोंदियाला लागून असलेला भंडारा व बालाघाट जिल्ह्यातही सारस आहे.

असा हा सारस पक्षी आज संकटात सापडलेला आहे. मानवाव्दारा केल्या जाणारी शिकार, शेतातून हुसकून लावणे, घरटे विस्कटून टाकणे, पक्षांना पळवून लावणे, विद्युत तारांमुळे होणारे मृत्यू, संकुचित होत जाणारा अधिवास, किटकनाशकांचा अत्याधिक वापर अशा विविध कारणांमुळे सारस पक्षांची संख्या कमी होत आहे.
जिल्हा प्रशासनाने देखील सारस पक्षी ज्या शेतक-यांच्या शेतीमध्ये घरटे करेल त्या शेतकऱ्याला आणि 1 कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे. या सर्व कारणांमुळे सारस पक्षांच्या संख्येमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. सारस पक्षी गोंदियाचे वैभव आहे. गोंदियाचेच कशाला हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि भारताचे देखील वैभव आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिक, पक्षीप्रेमी आणि गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे पक्षी वैभव जपण्याचा निर्धार करून या, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

सध्या ओमायक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असून याबाबतही जनजागृती या चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share