नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची दहशतवादी संघटनेकडून रेकी : पोलिसांकडून हायअलर्ट जारी

प्रतिनिधी / नागपूर : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेने नागपूरचे संघ मुख्यालयासह इतर संवेदनशील ठिकाणी रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह इतर ठिकाणाची दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेकडून रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, कोण-कोणत्या ठिकाणी रेकी करण्यात आली आहे, याचा तपास सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था वाढवली आहे. जर दहशतवादी संघटनेकडून कोणताही हल्ला तर पोलीस सज्ज आहे, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144(1)(3) प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे, असे आवाहन नागपूर पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share