ऑनलाईन क्लास- अभ्यासाचे दडपण यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी /नागपूर : घरची स्थिती चांगली नसल्याने नवीन मोबाईल मिळणार नाही आता कसे करायचे, ही चिंता त्यातच परीक्षेला तीनच महिन्यांचा कालावधी उरल्याने तो सैरभैर झाला होता. या अवस्थेत त्याने मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.अमृत यशवंत पांडे (वय १५) असे या मुलाचे नाव. जुना बाभूळखेडा भागातील वसंतनगरात यशवंत पांडे राहतात. ते खासगी काम करतात. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील अमृत हा दहावीत शिकत होता.आतापावेतो कोरोनामुळे ऑनलाईन क्लास होते. काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या वेगळ्याच दडपणात आहेत. त्यात सारखे क्लास अन् ऑनलाईन अभ्यासामुळे सर्वसाधारण कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईल हँग होणे, बंद पडणे, असेही प्रकार घडत आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांवरचे दडपण वाढले आहे.अमृतवरही अभ्यासाचा ताण होता, यातून त्याची चिडचिडही वाढली होती. या अवस्थेत त्याने मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास गळफास लावून घेतला. ते लक्षात येताच कुटुंबीयांनी खाली उतरवून त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शाळकरी अमृतने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली. त्याच्या घराजवळ शेजाऱ्यांनी एकच गर्दी केली.लाडक्या मुलाने गळफास लावल्याने अमृतच्या आई-वडिलांवर जबर मानसिक आघात झाला. दरम्यान, अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. 

Print Friendly, PDF & Email
Share