धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर 30 : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.

हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.

आनंदवन येथील घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे व वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे पोलीस ताफ्यासह दाखल झाले असून त्यांच्या घराची तपासणी सुरू केली आहे.
डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे वडील विकास आमटे, आई मंदाकिनी आमटे व भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी हेमलकसा येथे काही दिवसांपासून रहायला गेले होते.

शीतल करजगी आमटे यांच्या वक्तव्यावर आमटे कुटुंबियांनी दिले होते निवेदन

लोकाश्रयावर विकसित झालेल्या महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेबद्दल आमटे कुटुंबातील शीतल गौतम करजगी-आमटे यांनी अनुचित वक्तव्य असल्याबाबत बोलताना, आमटे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी, एका निवेदनाद्वारे, समितीच्या कामाबद्दल कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये अशी भावना अलीकडेच व्यक्त केली होती. २५ नोव्हेंबर रोजी त्यांचे हे निवेदन लोकमतने प्रसिद्ध केले होते.
डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी संयुक्तपणे काढलेल्या या निवेदनात, डॉ. शीतल करजगी यांनी संस्थेच्या कार्यात योगदान दिले आहे. परंतु त्या सध्या मानसिक ताण आणि नैराश्येचा सामना करीत आहेत. समाजमाध्यमांवर अलीकडेच त्यांनी तशी स्पष्ट कबुलीही दिली होती. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहन आमटे कुटुंबियांनी केले होते.
आमच्या नैतिक भूमिकांशी, ध्येय उद्दिष्टांशी आजन्म प्रामाणिक राहू, आमच्या प्रत्येक प्रकल्पात नैतिक कायदेशीर मूल्ये आणि पारदर्शकता जपली जाईल असेही त्यांनी या निवेदनात म्हटले होते.

Print Friendly, PDF & Email
Share