आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी खंडणी?; शाहरूखच्या मॅनेजरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज पार्टीतून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच गाजत असताना आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात प्रभाकर साईल याने हा गौप्यस्फोट करत या प्रकरणाचा पंच असलेल्या किरण गोसावीवरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.

या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे एक महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज आल्याने एकच खळबळ माजली आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानुसार आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली होती. त्यापैकी 8 कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना द्यायचे होते. तर इतर आपापसात वाटून घ्यायचे होते. त्यानंतर आता मुंबईतील लोअर परळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना पूजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसून आली. साईलनेही सर्व डिल लोअर परळ येथेच झाल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणात प्रभाकर साईलने केलेल्या आरोपानुसार पुरावे पोलिसांच्या हाती लागत असल्याने त्यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा मिळत असताना पाहायला मिळत आहे. या पुराव्याच्या जोरावरच आता आर्यन खान आणि पूजा ददलानीचा जबाब पोलीस नोंदवून घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share