दहावीच्या निकालाची वेबसाईट ‘क्रॅश’ होण्यामागील कारण समोर, चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १६ जुलै 2021 रोजी 10 वीचा ऑनलाइन निकाल दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच म्हणजे, दुपारी १२.५८ च्या सुमारास मंडळाचे संकेतस्थळ ‘क्रॅश’ झाले होते. ते सायंकाळी 5 ते 6 तासांनंतर पुर्ववत झाले.

दहावीच्या परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते. मात्र निकाल पाहता येत नसल्याने विद्यार्थी, पालक, शाळाचालक हवालदिल झाले होते. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यापासून प्रथमच असे घडले. त्यामुळे शिक्षण विभागासह राज्य सरकारवर अनेकांनी टीका केली होती.

निकालाच्या या अभूतपूर्व गोंधळामुळे शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. अखेर समितीने या प्रकरणाचा छडा लावला आहे. समितीने आपला अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे.

चौकशी अहवालात काय म्हटलंय..?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कोणतीही तांत्रिक तयारी नसताना, दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा अट्टहास नडला. त्यामुळे मंडळाचे संकेतस्थळ ‘क्रॅश’ झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

कोणतीही तांत्रिक तयारी नसताना, निकाल जाहीर करण्याची मंडळाची घाई या गोंधळाला कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठीच्या तांत्रिक उपाययोजनाही समितीने सुचविल्या आहेत.

सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळली
दरम्यान, 10 वीच्या निकालातून बोध घेत मंडळाने 12 वीचा ऑनलाइन निकाल (३ ऑगस्टला) जाहीर करताना पुरेशी तांत्रिक काळजी घेतली. मात्र, बारावीला १३ लाख विद्यार्थी असताना, निकाल जाहीर झाल्यावर अवघ्या तासात तब्बल साडेतीन कोटी ‘हिट्स’ आल्याचे दिसले होते.

सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत हा आकडा पाच कोटी ‘हिट्स’वर गेला. त्यामुळे मंडळाच्या वेबसाईटवर ‘सायबर हल्ला’ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चौकशी समितीने सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे. मंडळाने तांत्रिक तयारी न केल्यानेच हा प्रकार झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मंडळाने बारावीचा निकाल 5 वेगवेगळ्या संकेतस्थळावर पाहण्याची सोय केली होती. मात्र, दहावीच्या निकालासाठी एकच संकेतस्थळ असल्याने ते क्रॅश झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदविलेय.

Print Friendly, PDF & Email
Share