माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह बेपत्ता; राज्य सरकारची न्यायालयात माहिती

मुंबई  – मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमवीर सिंह यांच्यावर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमवीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही. यामुळे कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

तसेच यापुढे परमवीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्‍वासन आता पाळले जाण्याची शाश्‍वती देता येणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यावरून परमवीर सिंह यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर खुद्द परमवीर सिंह यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले. तसेच त्यांच्यावर अनेक ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र, परमवीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्यामुळे परमवीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.

दुसरीकडे परमवीर सिंह यांची बाजू कोर्टासमोर मांडणारे वकील महेश जेठमलानी यांनी मात्र त्यांना अजून फरार घोषित करण्यात आलेले नाही, असा युक्‍तिवाद केला.

Print Friendly, PDF & Email
Share