पेट्रोल डिझेलनंतर आता भाज्यांचे दरही गडाडले, टोमॅटो 20 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर

मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतीत पिकवलेली पीकं शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्यावी लागली होती. त्याचाच परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला असून भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर प्रचंड महागले आहेत. यामुळे चक्क 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोसाठी 80 रुपये मोजावे लागत आहेत.

आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर अक्षरश: दुप्पट झालेले आहेत. 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता 60 रुपयांना विकत घ्यावी लागतेय. कांदा याआधी 30 रुपये किलोने विकला जात होता. तो आता 55 रुपयांवर गेला आहे. ढोबळी मिरची 40 रुपये प्रतिकिलो रुपयाने विकली जात होती. ती आता 80 रुपयांना मिळत आहे.

हिच परिस्थिती इतर भाज्यांचीही आहे. वांग्याचा दर प्रतिकिलो 35 रुपये होता. तो दर आता 80 रुपये किलो झाला आहे. भेंडीचे दर तर गगनाला भिडले आहेत. सुरूवातीला भेंडीचा दर 30 रुपये प्रतिकिलो होता. मात्र आता भेंडी 80 रुपयाने विकली जातेय. गवारीचा भाव 40 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर पोहोचला आहे.

आधीच पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीही त्यात भर टाकत आहेतच. अशातच आता भाज्यांचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांनी आता खायचं काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share