“मुख्यमंत्रीपद गेल्यावर दोन माणसंही भेटायला येत नाहीत”

मुंबई: राज्यात मुख्यमंत्रिपदावरून गेल्या दोन वर्षापासून जोरदार चर्चा सुरू आहे. आता मुख्यमंत्रिपदावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. त्यातचं आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यावर दोन माणसंही भेटायला येत नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतयं, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून फडणवीसांना बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला कधी मुख्यमंत्री असल्यासारख वाटलं नाही, असं म्हणतं देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. त्यातच काल मुख्यमंत्र्यांनीही देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता .

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री बनण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत. उलट लोक म्हणतात हा गेला ते बरं झालं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुख्यमंत्री कितीतरी येतात आणि जातात असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी मात्र आहे त्यात समाधानी आहे. मला सर्वांनी फ्री हँड दिला आहे. मी निर्णय घेतो आणि ते माझ्या पाठिशी उभे राहतात. तसेच आज मला जनतेकडून जे प्रेम मिळत आहे ते महत्त्वाचं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •