सहाय्यक वनसंरक्षकास लाच घेताना अटक

ठाण्यातील एका सहाय्यक वनसंरक्षकास लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बळीराम तुकाराम कोळेकर असे याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे की, तक्रारदार हे वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ वर्ग २) टोकावडे दक्षिण या पदावर कार्यरत आहेत. तसेच बळीराम तुकाराम कोळेकर हे त्यांच्याच कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) मुरबाड व ठाणे येथे वरिष्ठ अधिकारी वर्ग १ या पदावर कार्यरत आहे.

बळीराम कोळेकर यांनी सन २०२० – २०२१ रोपवाटिका संदर्भात तक्रादार यांना प्राप्त झालेल्या अठरा लाखाच्या निधी मधील पाच टक्के प्रमाणे ९२,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जंगलाचे संरक्षण, रोपांची लागवड व इतर कामे याकरीता सन  २०२० – २०२१ व २०२१ – २०२२ या दोन आर्थिक वर्षातील एक कोटी सहा लाख चोवीस हजार रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झाला नसल्याने बळीराम कोळेकर आणि त्यांच्या वरिष्ठांकडे वारंवार मागणी केली असता, कोळेकर यांनी सदर निधी प्राप्त होण्याकरीता पाच टक्के रक्कम रु. ५,३०,०००/- जिल्हा नियोजन अधिकारी खंदारे यांना द्यावे लागतील असे सांगून लाचेच्या मागणीचा तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता.

सदर प्रकरणाची तक्रादार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बळीराम तुकाराम कोळेकर यांना तक्रादाराकडून रु. ५,३०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले आहे.

सदर प्रकरणी बळीराम तुकाराम कोळेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या कार्यालयातून रोख रक्कम १२,४६,५००/- रु. जप्त करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share