लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका

मुंबई: महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन वर्गात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कोरोना बाधितांच्या संख्येत घट होतांना निदर्शनास आलेले नाही. यामुळे राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेवर विशेष भर देण्यात येत आहे. यादरम्यान राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येणार आहे. राज्यातील शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण झाल्यानंतर, दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. आता उर्वरित वर्ग लवकरच सुरू होतील अशी आशा आहे, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल उचलण्यात येणार आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. 2 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची परिस्थिती काय असणार याचा विचार करून, त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share