परतीच्या पावसाने जिल्हा झाला ओलाचिंब

प्रा. डॉ.सुजित टेटे

गोंदिया 22: पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या जिल्हातील बळीराजाला सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने संपूर्ण जिल्ह्याला ओलेचिंब केले आहे. विशेषत: पावसाळ्याच्या सुरुवातीपासून लपंडावाचा खेळ मांडलेल्या पावसाने सप्टेंबर अखेरीस ओलेचिंब केले आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 22 दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात 344.7 मिमी पाऊस पडला आहे. यात दोन दिवस निरंक असून सर्वाधिक 49.3 मिमी. सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्हावासी चांगलेच चिंतेत फसले होते. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाचे महत्वाचे सर्वच नक्षत्र कोरडे गेले. परिणामी जिल्ह्यातील नदी नाल्यांमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता. जिल्ह्यातील धरणांसह इतर प्रकल्प कोरडे पडून होते. त्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट डोकाऊ लागले होते. शेतकरी देखील पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून प्रतीक्षा करीत होते. राज्यातील इतर जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद होत असताना व नदीनाल्यांना पूर येत असताना गोंदिया जिल्ह्यात त्याचे उलट चित्र होते. परिणामी खंडीत पावसामुळे जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झालेली नव्हती.

मागील जुलै महिन्यात 233 मिमी. व ऑगस्ट महिन्यात केवळ 219 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार ऐन्ट्री केली. या महिन्यात 2 व 19 या दोन तारखा वगळता प्रत्येकच दिवशी पावसाची नोंद करण्यात आली. विशेषत: 10 सप्टेंबर रोजी 47.2 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून 12 सप्टेंबर रोजी पुन्हा सर्वाधिक 49.3 मिमी. पाऊस झाला. आजच्या तारखेपर्यंत 344.7 मिमी. पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणातील जलसाठ्या वाढ झाली आहे.

आजघडीला इटियाडोह धरणात 71.23 टक्के, शिरपूर 87.30, पुजारीटोला 97.79 व कालीसरार धरणात 96.87 टक्के पाणी आहे. जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत 1220 मिमी. पावसाची नोंद करण्यात येत असताना 1 जून ते आजच्या तारखेत 1167.3 मिमी अपेक्षीत आहे. या तुलनेत आतापर्यंत 1138.1 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची टक्केवारी 97.5 टक्के आहे. तर मान्सून कालावधीच्या तुलनेत जिल्ह्यात 93.3 टक्के पाऊस झालेला आहे. महिना समाप्त होण्यासाठी आणखी 8 दिवस शिल्लक असून संबंधित विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा सुरुवातीला रुसलेला पाऊस परतीच्या प्रवासात जिल्ह्याला ओलेचिंब करीत असल्याचे दिसत आहे. 

मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी:

जिल्ह्यात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सरासरी गाठत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीची नोंद पाहता व सद्याची होत असलेली पावसाची नोंद यावरून जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या जवळ पोहचले आहे. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच पाऊस झाल्याचे वास्तव असून मागील वर्षी आजच्या तारखेत 1287.3 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची टक्केवारी 110.9 टक्के होती. मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे.

Print Friendly, PDF & Email
Share