लसीचे दोन डोज घेणाऱ्यांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश

मुकाअ यांचे आदेश : कोरोनापासून बचावासाठी लस घ्या आणि सुरक्षित राहा

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ या महामारीपासून व येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लसीचे दोन्ही डोज घेणे आवश्यक आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे कोविड-१९ चा प्रतिकार करणे सोपे होईल. तसेच इतरांना या रोगांपासून बचाव करण्याकरिता सहकार्य होईल. यासाठी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे आदेश मंगळवारी (दि.२१) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी काढले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने दुसऱ्या लाटेतून सावरलेल्या जिल्हा परिषदेने तिसरी लाट येऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्याचा पायंडा सुरू केला आहे. कोरानाच्या संदर्भात जिल्हा परिषद धोका पत्करायला तयार नाही. त्यासाठी आता कोरोनाला आळा घालणाऱ्या दोन्ही लसचे डोस घेतल्यावरच कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना जिल्एा परिषदेत प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने या लसीकरणाला गती देण्यात यावी अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपला बचाव करावा यासाठी दोन्ही डोस घेण्यात यावे, यासाठी जिल्हा परिषोच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय जिल्हा परिषदेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे. कोरोनामुळे पहिल्या लाटेत जि.प.अध्यक्ष सिमा मडावी यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणात पॉझीटीव्ह आढळले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम पडला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले आहे.

२७.५३ टक्के लोकांना दुसरा डोस
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्यता असतांना या कोरोनाला आळा घालण्यासाठी माठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची गरज आहे. आतापर्यंत २७.५३ टक्के लोकांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ८२ हजार ६३५ लोकांनी लस घेतली आहे. यात ७ लाख १२ हजार ५७ लोकांनी पहिला डोस तर २ लाख ७० हजार ५८७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या व्यक्तींनाच जिल्हा परिषदेत प्रवेश मिळणार आहे.

-नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प.गोंदिया.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •