अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ : २० कोटींपेक्षा जास्त टॅक्स चोरीमध्ये सहभाग असल्याचा आयकर विभागाचा खुलासा

मुंबई : लॉकडाऊन काळात अनेकांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार सोनू सूदचा २० कोटींपेक्षा जास्तच्या करचोरीमध्ये सहभाग आहे. आयकर विभागाने आरोप केला आहे की अभिनेता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी गोळा केले आहेत. यात एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण लवकरच सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, एफसीआरएच्या १ कोटीपेक्षा जास्त उल्लंघनाची चौकशी सीबीआयकडून केली जाते.
सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी घेतलेल्या शोधादरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की अभिनेत्याने बनावट संस्थांकडून बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात बेहिशोबी रक्कम जमा केली होती.
सीबीडीटीने दिलेल्या माहिनुसार, सोनूच्या विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधील लखनऊ स्थित औद्योगिक समुहावर देखील छापेमारी आणि जप्तीची कारवाई केली आहे. एकूण ३ दिवसांपासून ही छापेमारी सुरू असून साधारण २८ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांचा समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email
Share