गडचिरोली : पोलीस नाईक व पोलीस शिपाई अडकले एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली : गुन्हयात कोर्टात मदत करण्याकरीता व गाडी जप्त न करण्याकरिता १० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रूपयांची लाच रक्कम स्वीकारल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस नाईक पंकज विलास राठोड (३२) व पोलीस शिपाई पंकज विठ्ठल चव्हाण (३२) यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथक पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे देशबंधुग्राम ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे राहत असून ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांचे मित्राचे घरी कार्यक्रम असल्याने पाहुण्यांकरिता तारसा येथील देशी दारू आणित असताना पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस नाईक पंकज विलास राठोड व पोलीस शिपाई पंकज विठ्ठल चव्हाण यांनी पकडले व त्यांचेवर कारवाई केली. त्यानंतर त्यांना सोडण्याकरीत तसेच दाखल गुन्हयात कोर्टात मदत करण्याकरीता ३० हजार रूपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास आम्ही मदत करणार नाही व तुझी गाडी सुध्दा जप्त करू असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीमार्फत २० हजार आणुन पोलीस स्टेशन आष्टी येथे पोलीस शिपाई पंकज चव्हाण यांना दिल्यानंतर तक्रारदार यांना सोडले. पुढे तक्रादराार यांची गाडी दाखल गुन्हयात जप्त करू असे सांगितले. तक्रारदारास पोलीस नाईक पंकज राठोड व पोलीस शिपाई पंकज चव्हाण यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस निरीक्षक यशवंत राऊत यांनी गोपनियरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी पोलीस नाईक पंकज राठोड व पोलीस शिपाई पंकज चव्हाण यांनी तक्रारदारास दाखल गुन्हयात कोर्टात मदत करण्याकरीता व गाडी जप्त करण्याकरीता १० हजार रूपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रूपये पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील फॉरेस्ट नाका येथे आरोपी पोलीस नाईक पंकज राठोड यांनी स्विकारल्याने दोन्ही आरोपींना लाप्रवि गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यावरून त्यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन आष्टी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्यये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाप्रवि नागपूरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलींद तोतरे, गडचिरोली लाप्रवि चे पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत राउत, पोहवा प्रमोद ढोर, पोना सतीश कत्तीवार, देवंद्र लानबले, पोशि किशोर ठाकुर, महेश कुकुडकार, चापोना तुळशिराम नवघरे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share