पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ !

पुणे :पोलीस महासंचालनालयातून राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणार्‍या राज्यातील विविध पोलीस घटकांची घोषणा करण्यात आली. ताणतणाव आणि २४ तास धावपळ करणार्‍या पोलीस दलाला प्रोत्साहित करुन त्यांच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने काम करवून घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार प्रदान करण्याची योजना अंमलात आणली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा तसेच आयुक्तालयाची वर्षभरात ६ हजारांपेक्षा कमी गुन्हे – अ गट, ६ हजारांपेक्षा जास्त गुन्हे – ब गट आणि मुंबई पोलीस दलाच्या अंतर्गत सर्व घटक यांची क गट अशी विभागणी करण्यात आली.

कायदा आणि सुव्यवस्थेची घडी उत्तम राखण्याबरोबरच गुन्हे सिद्धी, तंत्रज्ञानाचा वापर, कम्युनिटी पोलिसिंग आणि पोलिसांचे हित जोपासून काम करवून घेतल्याबद्दल पुणे व नागपूर पोलिसांना ‘ब’ गटात ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ घोषित करण्यात आले आहे. ‘अ’ गटात औरंगाबाद आणि रायगड अव्वल ठरले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिटी पोलिसांवर भर देणार्‍या गडचिरोलीला दुहेरी यश मिळाले आहे.

त्यासाठी विविध विभागातून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची समिती गेल्या वर्षी तयार करण्यात आली होती. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्हे सिद्धीचा दर वाढविणे, तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त गुन्ह्यांचा छडा लावणे, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून लोकांची मने जिंकणे आणि प्रत्यक्ष काम करणार्‍या पोलिसांचे हित जोपासून त्यांना तणावमुक्त ठेवून काम करवून घेण्याचे टास्क या समितीने राज्यातील प्रत्येक पोलीस घटकांपुढे ठेवले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

या सर्व पातळीवर दर्जेदार कामगिरी बजावत ब गटात पुणे आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांनी ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ पटकाविला आहे. अ गटात बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक, रायगड यांनी मिळविला आहे. याच गटात दोष सिद्धीत पोलीस आयुक्त नवी मुंबई, तंत्रज्ञान आणि कम्युनिटी पोलिसिंग अशा दोन गटात गडचिरोली पोलीस अधीक्षक अव्वल ठरले आहेत. पोलीस कल्याणमध्ये वाशिमने अव्वल स्थान पटकाविले आहे.

ब गटात गुन्हे सिद्धीमध्ये मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मिळविले असून तंत्रज्ञानामध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त, ठाणे शहर संयुक्त विजेते ठरले आहेत. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पोलीस अधीक्षक सातारा आणि पोलीस अधीक्षक बीड हे बेस्ट ठरले आहेत.

पुरस्कार विजेते

अ गट

बेस्ट युनिट – औरंगाबाद ग्रामीण, रायगड पोलीस

दोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

तंत्रज्ञानाचा वापर – गडचिरोली, पोलीस अधीक्षक

पोलीस कल्याण उपक्रम – वाशिम, पोलीस अधीक्षक

ब गट

बेस्ट युनिट – पुणे शहर आणि नागपूर पोलीस आयुक्तालय

दोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबई

तंत्रज्ञानाचा वापर – कोल्हापूर, पोलीस अधीक्षक, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

कम्युनिट पोलिसिंगचा वापर – सातारा व बीड पोलीस अधीक्षक

क गटातील पुरस्कारांच्या शिफारसी समितीकडून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यांची निवड नंतर जाहीर करण्यात येणार आहे़.

Print Friendly, PDF & Email
Share