मोठी दुर्घटना…वर्धा नदीत बोट उलटून ११ बुडाले

राज्यात विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज वर्धा नदीत बोट उलटून ११ जण बुडाले अजून यातील ८ जण अद्याप बेपत्ता आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अमरावतीच्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथील धक्कादायक घटना आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून ८ जणांचा शोध घेण्यात येत आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एकाच कुटुंबातील ११ जण दशक्रिया विधीसाठी आले होते. काल दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज फिरायला गेले असता ही दुर्घटना घडली. सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.प्राप्त माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. बुडाल्यांमध्ये नारायण मटरे( वय ४५), अश्विनी खंडाळे (वय २५), वृषाली वाघमारे (वय १९), अतुल वाघमारे (वय २५), वांशिका शिवणकर (वय २), निशा मटरे (वय २२) ,किरण खंडाळे (वय २८), अदिती खंडाळे (वय १३) , मोहिनी खंडाळे (वय ११), पियुष मटरे (वय ८), पूनम शिवणकर (वय २६) असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share