महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावत अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण केली. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात येत्या 4-5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवली आहे.  आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात तीव्र होण्याची व वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या 2-3 दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे. मुंबई ठाणे सहीत अनेक भागांमध्ये 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share