वीज पडून शेकडो शेळ्या व मेंढ्या जागीच ठार

कोरची : तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ ते १३ किलोमीटर अंतरावर मसेली नजीक असलेल्या सावलीच्या जंगलात राजस्थान येथील मेंढकर शेळी व मेंढी यांचे कळप घेऊन असताना ९ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास वीज पडून सुमारे १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सदर मेंढकरांचा ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून हे मेंढकर शेळी व मेंढी चरविण्यासाठी येत असतात. यावर्षीसुद्धा तालुक्यात यांचे दोन डेरे आलेले आहेत. पैकी एक डेरा बेळगाव परिसरात व दुसरा डेरा सावली परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये ७ ते ८ परिवारांचा समावेश असून ते १ हजार च्या जवळपास जनावरे घेऊन आपला प्रवास करीत असतात.
९ सप्टेंबर च्या रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास या परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येऊ लागला व यांच्या डेरे जवळच १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या असल्या ठिकाणी अचानक वीज पडल्यामुळे ते जनावर जागीच ठार झाले. या घटनेची माहिती प्राप्त होतात कोरची येथील तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी २ ते ३ किलोमीटर पायी चालून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सदर घटना घडल्यानंतर त्या डेरे वाल्यांनी आपला डेरा त्या जागेवरून दुसर्‍या जागी हलविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share