‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भाजपला आता जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटते – नाना पटोले

मुंबई : वाढत चाललेल्या महागाईमुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. महागाईमुळे जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. गॅसच्या दरात भाववाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महागाईमुळे आधीच जगणं कठीण झालं असताना पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं .

केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचं पुन्हा स्पष्ट झाल्याचं नाना म्हणाले. यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भाजपला हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत असल्याचं म्हणत नानांनी केंद्रावर निशाणा साधला. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही टीका केली आहे.

आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 75 रूपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मन:पुर्वक आभार, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share