“तुम्ही फक्त काळजी घ्या, त्या फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघू” – राज ठाकरे

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर त्यांची दोन बोटं तूटली आहेत. पिंपळेंवर ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंगळे यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. पिंगळे या कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पिंगळे यांची अमरजीत यादव यांनी दोन बोट छाटली होती. तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, त्या फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू, असं राज ठाकरे म्हणाले.

फेरीवाल्यांच्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.  त्या परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरायलाच हवी. ज्या दिवशी तो फेरीवाला जेलमधून बाहेर येईल. त्याच दिवशी त्याला ठोकणार, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सोमवारी सांयकाळी कल्पिता पिंगळे यांच्याबरोबरच त्यांचा सुरक्षा रक्षक पालवे यांच्यावर ही फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर या दोघांनाही ठाण्यातील जुपीटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरजीत यादव या फेरीवाल्याला पोलिसांनी अटक केली आहे. यादव यांच्यावर तीन वर्षापूर्वीही अशा प्रकाराच्या गुन्ह्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share