गोंदिया पोलिसांची नक्षल दमन विरोधी सप्ताहात जनजागृती

गोंदिया 04: माओवादी संघटनेतर्फे २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पाळण्यात येणाऱ्या ‘नक्षल शहीद सप्ताहाला’ प्रत्युत्तर म्हणून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता नक्षल विचारसरणीच्या विरोधात प्रशासनाला सहकार्य करण्याचे उद्देशाने, पोलीस-जनता संबंध अधिक दृढ व्हावी, पोलीस प्रशासनाबाबत आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन व त्याअंतर्गत येणाऱ्या सशस्त्र दूरक्षेत्रांतर्गत नक्षल दमन विरोधी सप्ताह २१ जुलैपासून सुरू करण्यात आला आहे. नक्षल दमन विरोधी सप्ताहादरम्यान वृक्षारोपण, नक्षलग्रस्त भागातील शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळाविषयी मार्गदर्शन केले. दुर्गम भागात नक्षलविरोधी पोस्टर लावून नक्षलविरोधी प्रोपगंडा करून नक्षलवाद्यांचा निषेध करण्यात आला. ग्रामभेटीदरम्यान नक्षल विचारसरणीला बळी न पडण्याचे दृष्टीने तसेच नक्षल गावबंदी योजना राबविण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार व सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. विविध उपक्रम कार्यक्रम राबवून नक्षलग्रस्त भागात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात आले. या सप्ताहात नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता, शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे, शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share