चिचगड ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांची वानवा

◾️दोन परिचारिकांच्या खांद्यावर रूग्णालयाचा भार , ◾️परिचारिकांची पदे न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन

देवरी(चिचगड) 02: सध्याच्या कोरोना स्थितीत ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असताना येथील ग्रामीण रुग्णालयात विविध अधिकारी- कर्मचाऱ्यांची व परिचारिकांची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून येथे उपलब्ध करून देण्यात आलेली यंत्रसामग्री धूळखात आहे. व रोग्यांचे परिचारिकाच्या अभावी ग्रामीण रुग्णालयात हाल होत असल्याचे चित्र आहे

चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. रुग्णालयातील क्ष-किरण विभाग बंद आहे. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिकांचा खूप मोठा आदर आणि सन्मान केला जात आहे. कारणही तसेच आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये जगाला कळून चुकले आहे की, वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिका हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, म्हणूनच वैद्यकीय क्षेत्राचा कणा म्हणून परिचारिकांकडे पाहिले जात आहे.

अशातच चिचगड ग्रामीण रुग्णालयात ७ परिचारिकांची पदे मंजुर असुन ३ पदे भरलेली आहेत. त्यापैकी २ परिचारिका प्रतिनियुक्तीवर इतरत्र आहेत.

२ कंत्राटी परिचारिका आहेत. त्यातही १ परिचारिका वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा डोलारा २ परिचारींकाच्या खांद्यावर आहे. व त्यातीलही १ परिचारिका ह्या गर्भवती आहेत. त्यामुळे कामाचा ताण व्यापणे अशक्यप्राय गोष्ट आहे. अशा स्थितीत कार्यरत परिचारिकांना शारिरीक व मानसिक ताणाला समोरे जावे लागते आहे. एकंदर रूग्णालयाची प्रतिकूल परिस्थिती पाहता व परिचारीकेची रिक्त पदे जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासनाने आठ दिवसात न भरल्यास रुग्णालयासच ताला ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंदल अरकरा यांनी दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share