केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असलेल्या बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला अलविदा!

नवी दिल्ली 31: काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक केंद्रीय मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचादेखील समावेश होता.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी राजीनामा द्यावा लागल्याने बाबुल सुप्रियो हे नाराज होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यातच आज बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपण राजकारणाला कायमचा अलविदा करत असल्याचं म्हटलं आहे.

बाबुल सुप्रियो यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत मला समाजकार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची अथवा पदाची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राजकारणातून बाहेर पडत असलो तरीही भाजपच्या विचारधारेशी बांधील राहू, असं म्हणत भाजप पक्षश्रेष्ठी माझा निर्णय समजून घेतील, असं देखील सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज बाबुल सुप्रियो यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेतला आहे.

◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️

Print Friendly, PDF & Email
Share