मोटार साइकलच्या अपघातात जि.प. शिक्षकाचा मृत्यू

सालेकसा 31 : जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरवाणी ( सालेकसा) येथे कार्यरत शिक्षक शिवप्रकाश जतपेले हे शालेय कामकाज आटोपून गावाकडे परत जात असतांना साकरीटोला- कवडी मार्गावर अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की, दवनीवाडा निवासी शिवप्रकाश जातपेले हे जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा पांढरवाणी (ता. सालेकसा) येथे कर्तव्यावर होते. काल दि. 30/10/2020 ला पांढरवाणी वरून मूळगावी जाण्यास सायंकाळी साकरिटोला- कवडी या मार्गाने निघाले असता रस्त्यावर त्यांचे मोटारसायकलवरून नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यालगतच्या झुडपात गाडीसकट पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व ते जागीच मृत्यू पावले. सदर रस्ता सायंकाळी निर्जन असल्यामुळे कुणाचेही ते लक्षात आले नाही. आज सकाळी लोकं त्या रस्त्याने जाऊ लागल्याने सदर व्यक्ती पडला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लोकांनी पोलीस स्टेशन सालेकसाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळल्याबरोबर पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी बीट अंमलदार श्री चौबे यांना घटनास्थळी रवाना केले व बॉडी ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे पाठविले. पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल करून घेतला. मृतक शिक्षकाच्या गळ्यात त्याचे ओळखपत्र असल्याने त्याचे मूळगावी संपर्क करण्यात आला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पं. स. सदस्य गुड्डू लिल्हारे यांना घेऊन सालेकसा येथे गेले व पोलीस स्टेशनशी सर्व संबंधित कार्यवाही पूर्ण करून प्रेत मूळगावी नेऊन अंत्यसंस्कार करणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. मृतक शिक्षकाच्या मागे शिक्षिका पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. अचानक अल्पवयात या शिक्षकाचे निघून जाणे मनाला चटका लावून जाणारे असून शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी हानी झाली आहे. सर्वत्र हळहळ व दुःख व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share