वासराला वाचवण्यासाठी गायीची विहिरीत उडी

यवतमाळ- जगामध्ये आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही, असं म्हटलं जातं. आईचं नि:स्वार्थ प्रेम हे जगजाहीर आहे. असाच काहीसा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुकिंदपुर गावामध्ये आपल्या वासराला वाचवण्यासाठी एका गाईने चक्क विहिरीत उडी घेतली.

यवतमाळमध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे मुके जनावरंही उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्याचा शोध घेत आहेत व त्यासाठी वणवण भटकत आहेत. अशाच पाण्याच्या शोधात असलेल्या एका वासराला एक विहीर दिसली आणि ते वासरू चुकून विहिरीत पडले व जिवाच्या आकांताने त्याने हंबरायला सुरुवात केली.

त्याचा आवाज ऐकून गाईने त्याच्या दिशेने धाव घेत आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट विहिरीत उडी घेतली. आईच्या नि:स्वार्थ मायेचा प्रत्यय मुकिंदपुर गावातील लोकांनी अनुभवला. दरम्यान, हा सर्व प्रकार तिथून जाणाऱ्या संजय राऊत यांनी पाहिला व त्यांनी लगेच गुरं राखणाऱ्या व्यक्तीला याबद्दल माहिती देऊन तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

गाय व तिच्या वासराला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळानंतर दोरखंडाच्या सहाय्याने गाईला व तिच्या वासराला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आलं. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. हे सर्व घडत असताना स्थानिक लोकांनी येथे मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पण अखेर या दोन्ही मुक्या प्राण्यांचा जीव वाचल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं.

Print Friendly, PDF & Email
Share