18 ते 44 वयोगटाचं लसीकरण काही दिवस स्लो डाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

मुंबई 11: महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. यात राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलं आहे. पण सध्या सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात 5 लाख नागरिक कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत, तर कोविशील्ड लसीच्या प्रतीक्षेत 16 लाख जण आहेत. कोवॅक्सिन लसीचे केवळ 35 हजार डोसच उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत. तर केंद्राने दिलेले 35 हजार डोस आहेत. हे सर्व डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आतापर्यंत 1 कोटी 84 लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. केंद्राकडून 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसी येत आहेत. दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असलेल्यांसाठी लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरली जाणार आहे. याबाबत राज्याच्या कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन तूर्तास 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण काही दिवस स्लो डाऊन करावं लागलं, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share