पडद्यामागील खरे कोरोना योद्धे ‘आशा’ सेविका

शब्दांकन – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

कोरोना योद्धा म्हणून समाजातील किती तरी लोक बोंबा मारत असतांना ग्राऊंड झीरो काम करणार्‍या आशा सेविका आज आशेचे किरण ठरत आहेत. शिक्षण साधारण दहावी पास! पण तीच आता सगळ्यांची आशा ठरली आहे हे निश्चित !

2005-2012 या काळात सुरू झालेल्या ‘राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन’ची ‘आशा वर्कर’ ही ग्रामीण समाजाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी म्हणावी लागेल. ‘आशा’ म्हणजे Accredited Social Health Activist याचं लघुरूप! या व्यक्ती कोण असतात? गावातच राहणाऱ्या, किमान दहावी शिक्षण असणाऱ्या 25 ते 45 वयातील महिलांना प्रशिक्षण देऊन शासकीय आरोग्य यंत्रणा सुरळीत गावात पोहचते. साधारण 1 हजार लोकसंख्येसाठी एक ‘आशा वर्कर’ शासनानं भारत भर नेमलेली आहे.

आशा सेविका सर्वे करतांना

‘कोरोना’ साथीच्या दुसऱ्या लाटेत लसीकरणावर मोठे भार असताना ग्रामीण भागात ‘आशा’च्या भूमिकेत आईच्या मायेने पुढे आली आहे. लस ‘टोचून’ न घेतलेल्या लोकांना विशेषत: वयस्क आणि आजागृक लोकांना समजावून सांगताना त्यांच्यातल्या प्रेमाचा कस लागतो आहे. कधी लसीचं महत्व पटवून देत त्यांना ती तयार करते आहे, तर कधी अधिकारानं रागे भरते आहे. माझ्या गावातल्या वयोवृद्धांचं शंभर टक्के लसीकरण व्हायलाच हवं, असा निर्धार गावोगावीच्या ‘आशां’नी केला, त्यामुळे ग्रामीण लसीकरणाचा आकडा वाढतो आहे. आपल्या गावातील लोकांचे आरोग्यदायी जीवन करणाऱ्या या ‘आशा’ कोरोनाच्या संकटाविरुद्धची ‘आशा’ ठरल्या आहेत.

शहरात राहणारे आपण वर्तमानपत्रातल्या, दूरचित्रवाणीवरच्या आणि मुख्यत: मोबाइलवरच्या बातम्या, पोस्ट्स बघून आजूबाजूला काय चाललंय याची माहिती घेत असतो. ‘कोरोनाने अगदी कहर केला आहे ’, ‘रुग्णालयात बेड मिळत नाही’,‘इंजक्शन नाही, लशी कमी पडत आहेत ’. पुन्हा टाळेबंदीसारखे कडक निर्बंध जाहीर झाले आणि मग काय, या नकारात्मक गोष्टींपेक्षा दुसरा विषयच नाही, पण नंतर वृत्त संकलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील लसीकरणाचा आढावा घेतला असता गावातल्या माता बनलेल्या या आशा सेविका चे योगदान स्पष्ट करता येऊ शकत नाही.

आताच्या या टाळेबंदीत कुठल्या मदतीची आवश्यकता आहे तेव्हा लक्षात आलं, की गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातल्या कोरोना संकटापेक्षा यंदाच्या मार्च महिन्यात आलेलं कोरोना संकट जरा वेगळं आहे. संकटाची तीव्रता कदाचित जास्त असली, तरी वर्षभराच्या अनुभवानं ग्रामीण माणूस अधिक सावध झाला आहे. कधीही काहीही बंद होऊ शकतं, याचं शिक्षण गेल्या अनुभवातून त्यांना मिळालं आहे. त्यामुळे अशी काही काळजी कोणाच्याही बोलण्यात दिसली नाही. आरोग्यासाठी गावातल्या सगळ्यांचं सध्या एकमेव आशास्थान आहे ते म्हणजे ‘आशा’. आशा म्हणजे गावाच्या आरोग्याची काळजी घेणारी गावातच राहाणारी स्त्री. शिक्षण किती विचाराल, तर साधारण दहावी पास! पण तीच आता सगळ्यांची आशा आहे हे विशेष.

साधे ताप-सर्दी पडसं-जुलाब झाले तर काय औषध द्यायचं हे सांगायलासुद्धा अनेक ठिकाणी पंचक्रोशीत डॉक्टर नसतो. प्रशिक्षणानंतर ‘आशा’ याच काय ते गावात औषधं देतात. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (डब्ल्यूएचओ) निर्देशाप्रमाणे 1100 लोकांमागे 1 डॉक्टर हवा, पण आपल्याकडे ग्रामीण भागात 10000 हून अधिक लोकसंख्येसाठी 1 शासकीय डॉक्टर, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. खासगी डॉक्टर केवळ बाजाराच्या गावातच बहुतेकदा बघायला मिळतात. या सगळ्याचा आताच विचार करायची गरज काय? तर करोना हे आरोग्य संकट आहे. त्याच्याशी लढायचं तर आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे समजणारं प्रशिक्षित मनुष्यबळ हवं. ग्रामीण भागात ही ‘करोनायोद्धय़ा’ची भूमिका गावातल्या आशा वर्कर आणि अंगणवाडीच्या ताई या दोन स्त्रिया आईच्या मायेनं सांभाळत आहेत. तालुक्याचे तहसीलदार बैठका घेत आहेत, या दोघींना गावाचं सर्वेक्षण करायला सांगत आहेत. स्थानिक असल्यामुळे दिवसरात्र फिरून त्या प्रत्येकाची नोंद करत आहेत. शासनानं गेलं वर्षभर या ‘आशां’साठी प्रशिक्षणं घेतली. या सगळ्या प्रयत्नांत ‘आशां’ना समजलं, की कोरोनाचा प्रतिबंध करायचा तर सध्या लसीकरण हेच एकमेव उत्तर आहे आणि या गावोगावच्या ‘आशा’ कामाला लागल्या.

‘आशा वर्कर्स’ना डॉक्टरांनी प्रशिक्षण दिल्यावर त्या एकेकाला भेटून त्या लसीकरणाचं महत्त्व पटवून देऊ लागल्या. काही जण लगेच तयार होतात, पण काही तयारच होत नाहीत. काहींना ही लस दिल्लीतून आली की मुंबईतून, असे प्रश्न पडतात. काहींना सोयीची एसटी नाही, मग दवाखान्यात कसं जायचं, ऊन तर ‘मी’ म्हणतं आहे, असे प्रश्न पडतात. अशा वेळी या स्वयंप्रेरित ‘आशा’ खरोखर दूत होऊन एकेकाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. वरवर दिसणाऱ्या या प्रश्नांमागे खरं तर आहे लशीची भीती! आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच ‘टोचून’ घेतलं नाही अशीही काही माणसं या ‘आशां’च्या आजूबाजूला आहेत. कालपर्यंत ‘आशा’ शासकीय लसीकरण करत होत्या, आजही करत आहेत, पण ते बाळांसाठी करायचं काम आहे म्हणून तुलनेत सोपं होतं. आताच्या या लसीकरणासाठी ‘आशां’च्या वयापेक्षा मोठय़ा माणसांना तयार करायचं म्हणजे परीक्षाच. त्यात स्त्रियांबरोबर माणसांनाही तयार करायचं आहे. यातला एखादा तिचा सासरा असतो, तर एखादा चुलता. मग त्याला समजावताना ‘लहान तोंडी मोठा घास’ वाटला तरी ते करतात. ही परिस्थिति समोर असतांना मग या ‘आशा’ डॉक्टरांना म्हणायच्या, ‘‘सर, एकदा पहिल्या काही लोकांना गावातच जाऊन लस देऊ. त्यांना त्रास झाला नाही हे माहीत झाल की बघून बाकीचे लोक येतील पण पहिल्यांदा गावातच होऊ दे!’’ मग काही ठिकाणी आशाच्या सांगण्यानं मोहीम गावात गेली. काही चे पहिले लसीकरण झाले ते यशस्वी लसीकरण बघून आता लोक आपणहून नंबर लावून लस घ्यायला दवाखान्यात येऊ लागले. तिचे बोलणे अगदी बरोबर होते. शासनाचे डॉक्टर आणि बाकीचे कर्मचारी मदतीला होतेच.

प्लस पोलिओ मध्ये आशा सेविकेचा सहभाग

एक ‘आशा’ सांगत होती, ‘‘मी ठरवलंच होतं, की माझ्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचं 100 टक्के लसीकरण कराच आहे मग मी सगळ्या लोकांना सांगितलं, ‘हे बघा, डॉक्टर आधार कार्ड बघतात आणि त्याचा नंबर लिहून घेऊन मगच लस देतात. तुम्हाला फायदा मिळणाऱ्या बाकी सगळ्या योजनासुद्धा आधार कार्डाला जोडल्या आहेत. कोण लस घेतो हे सरकारला माहीत होते मग लोक पटापट लसीकरणाला तयार झाले. रेशनपासून श्रावण बाळ योजनेपर्यंत सगळ्या योजना आधार कार्डला जोडल्या आहेत हे त्यांना माहिती आहे. माझ्या गावातून कोरोनाला मी हद्दपार करणार! या सकारात्मक गोष्टीने गावागावात हक्काने लसीचे महत्व सांगून फुटक्या मानधनावर काम करणाऱ्या ‘माता’ तयार झाल्या आहेत.

‘आशा वर्कर’ यांच्याशी झालेल्या संवादात मी जे-जे वृत्तपत्रांत वाचतो ते कोणीच सांगितलं नाही. डॉक्टर, नर्स लस टोचत होते, मग आम्ही त्यांचे सोबत होतोच, असं त्या मनापासून सांगत होत्या. काय करत होत्या या ‘आशा वर्कर ’? तर आधार कार्ड नोंदवायला मदत करणं, लस घेताना हात धरायला, लस घेऊन झाल्यावर विश्रांती घेताना शेजारी थांबणं, घरी सुखरूप पोहोचायचा प्रवास ठरवायला मदत करणं, रात्री प्रत्येकाच्या घरी जाऊन ताप न येण्याची गोळी घेतलीय का, ते बघणं, दुसऱ्या दिवशी काही त्रास होत नाही ना हे बघणं आणि हे सगळं यशस्वी झालं की, ‘शेजारच्याला सांगा, आता मी लस घेतलीय, त्रास होत नाही. तू पण घे!’ असा आग्रह करणं. इथपर्यंत सगळं ‘ती’ करत होती आणि करते आहे. म्हणून ग्रामीण लसीकरणाचा आकडा समाधानकारक आहे.

लस देताना डॉक्टरांचं काम एका रुग्णासाठी काही सेकंदांचं असतं, ते महत्त्वाचंच; पण त्यापूर्वी काही तास, काही दिवस ज्येष्ठ नागरिक डॉक्टरांसमोर पोहोचण्यासाठी ‘ती’ काम करत असते, पटवत असते, व्यवस्था करत असते आणि लस दिल्यावरही काही तास ‘ती’च काळजीही घेत असते. तिचीच सोबत या ज्येष्ठांना असते. यामुळे गावातल्या करोनाला तरी ‘ती’ हरवणार आहे, कारण ती जागी आहे. गावाची ती मोठी ‘आशा-माता’ आहे! आणि या आशा आपल्या कार्याचा डिंडोरा पिटतांना अजून तरी आढळून आले नाही वा कुणी यांचा कोरोना योद्धा म्हणून कौतुक केल असेल ते देखील निरुत्तरीत आहे.

कोरोना च्या संकटात आपले सर्वस्व प्रयत्न करून ग्रामीण भागाची धुरा सांभाळणार्‍या ” आशा सेविकांना ” माझा सलाम…

Print Friendly, PDF & Email
Share