होय १०० क्रमांक होणार बंद पोलीस, अग्निशमन, महिला हेल्पलाईनसाठी ११२ हा एकच नंबर

प्रमोद सोनार / प्रहार टाईम्स प्रतिनिधी

मुंबई 21-

लवकरच महाराष्ट्रात पोलिसांशी संपर्क साधण्याचा १०० हा क्रमांक बंद होणार आहे. त्याऐवजी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु होणार आहे. या क्रमांकावर पोलीस, अग्निशमन आणि महिला हेल्पलाईन या तीन प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातील २० राज्यांनी ही सेवा सुरु केली आहे. त्यातच महाराष्ट्र राज्याने देखील हा उपक्रम राबविण्याचा विचार सुरु केला आहे.महाराष्ट्र राज्यात पोलिसांना संपर्क करण्यासाठी १००, अग्निशमन विभागाला संपर्क करण्यासाठी १०१ आणि महिला हेल्पलाईनला संपर्क करण्यासाठी १०९० हे क्रमांक उपलब्ध आहेत. याचे एकत्रीकरण करून ही प्रकिया केंद्रीकृत केली जाणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन. यांची सेंट्रलाईज हेल्पलाईन सिस्टीमचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचा वायरलेस विभाग आणि तांत्रिक व प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखांची राज्यस्तरीय समिती यासाठी स्थापन करण्यात आली आहे. देशभरात २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ११२ हा क्रमांक सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांनी देखील ही सेवा सुरु करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. या वर्षाखेर पर्यंत ११२ हा हेल्पलाईन क्रमांक राज्यात सर्वत्र सुरु करण्याचा महाराष्ट्र पोलिसांचा मानस आहे.पोलीस प्रशिक्षण केंद्रातून संबंधितांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर, तो फोन कुठून आला आहे याची माहिती तत्काळ संबंधित यंत्रणांना मिळेल.पोलीस, अग्निशमन दल अथवा महिला हेल्पलाईन यांच्याकडे त्याची माहिती एकाच वेळी उपलब्ध होईल. ११२ ही हेल्पलाईनवर आलेल्या फोनला कोणी, काय प्रतिसाद द्यायचा, माहितीची देवाण घेवाण, मदत याबाबतची प्रक्रिया तसेच प्रशिक्षण या बाबींची पूर्तता झाल्यानंतरच १०० हा क्रमांक बंद केला जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share